तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवात दर्शन रांगेत गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. मंदिर समितीच्या नियोजनशून्य कारभारामुळे भाविकांना दर्शनासाठी ८ तासांहून अधिक वेळ रांगेत उभे रहावे लागत आहे. यामुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
दरम्यान, आज चौथ्या मजल्यावरील दर्शन रांगेत पंढरपूरहून आलेल्या ७-८ तरुणांनी रांगेत जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. हैद्राबादहून आलेल्या भाविकांनी त्यांना आक्षेप घेतल्याने या तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत हैद्राबादचे ३ भाविक जखमी झाले असून, त्यापैकी २ जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
पोलिसांनी मारहाण करणाऱ्या ७ तरुणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल करू नये, यासाठी काही राजकीय दबाब आणला जात असल्याचे वृत्त आहे.
या घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मंदिर समितीने व्हीआयपींना ५ मिनिटांत दर्शन घडवून, सामान्य भाविकांना मात्र तासनतास रांगेत उभे करण्याचा प्रकार बंद करावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.