तुळजापूर: श्री तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली सुरू असलेल्या काळाबाजाराची आणि भ्रष्टाचाराची ‘धाराशिव लाइव्ह’ ने पोलखोल केल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी या गंभीर प्रकाराविरोधात थेट जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्याकडे तक्रार दाखल करत जोरदार आवाज उठवला होता. या तक्रारीची आणि ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कठोर पाऊले उचलली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांना दिले जाणारे व्हीआयपी दर्शन पास तात्काळ प्रभावाने बंद केले आहेत. इतकेच नव्हे, तर या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पाच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आहे. या समितीत उपजिल्हाधिकारी, आरडीसी (निवासी उपजिल्हाधिकारी) तथा मंदिर तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी), आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे.
या समितीला अवघ्या आठ दिवसांच्या आत आपला चौकशी अहवाल सादर करण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. समितीचा अहवाल येईपर्यंत राजकीय नेत्यांसाठीचे व्हीआयपी पास पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे.
गेल्या काही काळापासून मंदिरात व्हीआयपी पासच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याची ओरड होती. लोकप्रतिनिधींच्या ठराविक कोट्याच्या नावाखाली परस्पर पास विकले जात असल्याच्या तक्रारी खुद्द पुजारी वर्गाने आणि आमदार कैलास पाटील यांनी प्रशासनाकडे केल्या होत्या. आता या चौकशी समितीच्या माध्यमातून या घोटाळ्याची पाळेमुळे खणून काढली जातील आणि दोषींवर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. समिती नेमकी काय चौकशी करणार आणि कोणाकोणावर कारवाईची टांगती तलवार असणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.