धाराशिव – श्री तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याच्या संवर्धनासाठी तुळजापूर शहरातील नागरिक, व्यापारी, पुजारी बांधव आणि भाविकांनी एकत्र येत 5240 सह्या संकलित केल्या. हे निवेदन जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांना सादर करण्यात आले आहे.
गर्भगृहाच्या संरक्षणासाठी मागणी
मंदिराच्या गाभाऱ्यातील ग्रेनाईट काढून एक महिना उलटला असतानाही अद्याप स्ट्रक्चर ऑडिट झालेले नाही. भाविकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन मूळ गाभाऱ्याचे रक्षण व्हावे, तसेच मंदिर परिसरातील भूगर्भीय स्थितीचा अभ्यास करण्यात यावा, या मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आले आहे. यापूर्वी 8 जानेवारी रोजीही असेच निवेदन देण्यात आले होते, मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.
मंदिरातील शिळांना तडे – व्यापक ऑडिटची गरज
गर्भगृहाबरोबरच चोपदार गाभारा, सिंह गाभारा आणि भवानी शंकर सभामंडपातील शिळांना तडे गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मंदिराचा सखोल स्ट्रक्चर ऑडिट आणि भूगर्भीय ऑडिट तातडीने करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच वाढत्या भाविक संख्येच्या दृष्टीने प्रशस्त गाभाऱ्याची निर्मिती करण्याचेही सुचवण्यात आले आहे.
लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा
मंदिर प्रशासनाने अद्याप या विषयावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. तसेच मंदिर प्रशासन, तीनही पुजारी मंडळ, सर्व महंत, सेवेकरी, व्यापारी वर्ग आणि राजकीय-सामाजिक संस्था यांची बैठकही झालेली नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जयंती, 19 फेब्रुवारी 2025 रोजी लोकशाही मार्गाने ‘लाक्षणिक उपोषण’ करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर इंद्रजित साळुंके, बाळासाहेब भोसले, किशोर गंगणे, जगदीश पलगे, श्रीकृष्ण साळुंके, मयूर कदम, सागर इंगळे, नितीन जटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.