तुळजापूर: नगरपरिषदेच्या अधिकृत वाहनतळ ठेक्याचा कालावधी ८ फेब्रुवारी रोजी संपल्यानंतर, यंदा शहर एन्ट्रीच्या नावाखाली कोणतीही अधिकृत लूटसत्र राबवले गेले नाही. मात्र, काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी संधी साधत नगरपरिषदेच्या बनावट पावत्या छापल्या आणि भाविक व वाहनचालकांकडून अवैध वसुली सुरू ठेवली.
शनिवारी (दि. ९) मध्यरात्री नगरपरिषदेच्या अधिकृत वाहनतळ परिसरात दोन इसम बनावट नगरपरिषद पावत्या फाडताना रंगेहात पकडले गेले. या इसमांनी नगरपरिषदेच्या नावाने खोटे बिल बुक तयार करून वाहनधारकांकडून पैशांची उकळी केली. नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत या दोघांना पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. मात्र, पोलिस प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
पोलिसांचा गूढ शांतता – मुख्य सूत्रधार कुठे?
नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी दोन्ही आरोपींना पुराव्यासह पोलिसांच्या ताब्यात दिले, तरी पोलिसांनी याप्रकरणी पुढील कारवाई केली नसल्याचा आरोप होत आहे. या बनावट पावत्या घोटाळ्यामागचा म्होरक्या कोण? याचा तपास करून पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता होत आहे.
नगरपरिषद कर्मचाऱ्यांची तत्परता!
नगरपरिषदेचे कर्मचारी गायकवाड आणि पाठक यांनी दोन इसमांना रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली केले. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी मोठ्या सूत्रधाराचा तपास करून कारवाई करावी, अशी स्थानिक नागरिक व भाविकांची मागणी आहे.