तुळजापुर – सध्या तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव सुरु आहे आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या आशीर्वादामुळे दोन नंबरचे धंदे जोरात सुरु आहेत. धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर जुजबी कारवाया सुरु आहेत.
शहरातील बाबजी लाकडी अड्डा बाजुस रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत जुगार खेळताना दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेतील सुदर्शन भारत कासार (वय 38) यांनी फिर्याद दिली आहे.
तपासातील माहितीप्रमाणे, आरोपी महेश दिलीप हाके (वय 29) आणि दुसरा आरोपी, ज्याचे पूर्ण नाव व गाव माहित नाही, हे चन्ना मन्ना (टायगर गेम) नावाच्या जुगार खेळत होते. नवरात्र उत्सवात आलेल्या भाविकांना कमी पैशात जादा रक्कम मिळवण्याचे आमिष दाखवून हा जुगार खेळवण्यात येत होता.
पोलीसांनी घटनास्थळी छापा मारून आरोपींच्या ताब्यातून २,९०० रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. यामध्ये ५०० रुपयांच्या ५ नोटा आणि १०० रुपयांच्या ४ नोटांचा समावेश आहे. तसेच तीन लाल रंगाचे गोलाकार फायबरचे रिंग, ज्यावर दोन रिंगांवर झिरो आणि एक रिंगवर सात अंक होता, आणि एक पांढऱ्या रंगाचा फायबर टेबल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास PN/837 साळुंके करत आहेत.