उमरगा – तालुक्यातील माडज येथे अज्ञात चोरट्याने दोन घरे फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारच्या (दि.१३) मध्यरात्री घडली असून, गुरुवारी याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शंकर प्रेमनाथ गायकवाड (वय ३०, रा. माडज) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी रात्री ११ ते १४ ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने शंकर गायकवाड यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाची कडी काढून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ३०,००० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
एवढ्यावरच न थांबता चोरट्याने गायकवाड यांचे शेजारी तानाजी मनोहर पाटील यांच्या घरातही प्रवेश करून तेथील १०,००० रुपयांची रोख रक्कम लंपास केली. दोन्ही घरातून मिळून एकूण ६० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
गुरुवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शंकर गायकवाड यांनी उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) आणि ३०५(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.