नळदुर्ग: मुंबई-हैदराबाद महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात घडला. नळदुर्ग जवळील आलियाबाद ब्रिजजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक जण जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि. ०९/०१/२०२५) रोजी सकाळी १०.२५ वाजता मुंबईहून हैदराबादकडे जाणारा ट्रक क्रमांक MH.12.AP.8845 आणि हैदराबादहून मुंबईकडे येणारा ट्रक क्रमांक MH.43.BX.6075 हे दोन्ही ट्रक आलियाबाद ब्रिजजवळ आले असता समोरासमोर धडकले. या अपघातात राजू राम चव्हाण (वय २५ वर्षे, रा. कुनूर, ता. विजापूर) हा जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच ट्रॅफिक पोलीस कदम यांनी नळदुर्ग येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज्धामच्या रुग्णवाहिकेला पाचारण केले. रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि जखमी राजू चव्हाण यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघाताची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.