धाराशिव: भारतीय जनता पक्षाने केलेल्या आरोपांना शिवसेना (उबाठा गट) शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आपल्या मालकाचे (आमदार राणा पाटील यांचा अप्रत्यक्ष उल्लेख) १५ टक्के कमिशन बुडाल्याच्या तीव्र दुःखामुळे भाजपची मंडळी आता फडफड करत आहे,” असा टोला लगावत, भाजपने उल्लेख केलेल्या ‘टक्केवारी विद्यापीठाचे’ संस्थापक स्वतः राणा पाटीलच असल्याचा गंभीर आरोप गुरव यांनी केला आहे.
भाजपच्या प्रसिद्धीपत्रकाला उत्तर देताना सोमनाथ गुरव म्हणाले, “ही कामे टक्केवारीसाठी रखडली हे अगदी बरोबर आहे, पण ती तुमच्या मालक (राणा पाटील) आणि दुसरे माजी पालकमंत्री (तानाजी सावंत यांचा अप्रत्यक्ष उल्लेख) यांच्यातील भांडणामुळे रखडली आहेत. म्हणूनच आमची मागणी आहे की मुख्याधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा, म्हणजे तुमच्या विद्यापीठ संस्थापकाचे खरे रूप समोर येईल.” सत्तेत असताना भाजपनेच विरोधी पक्षावर टक्केवारीचे कारण सांगणे हास्यास्पद आणि मूर्खपणाचे असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अंदाजपत्रकीय दराचे धोरण राज्यासाठी बनवले या भाजपच्या दाव्यावर गुरव यांनी सवाल केला. “इतके दिवस तुम्हाला या धोरणाची माहिती नव्हती का? धाराशिवच्या कामांबाबतचा निर्णय २ मे रोजीच्या पत्रात स्पष्ट नमूद केला आहे,” असे ते म्हणाले. भुयारी गटार योजनेवर टीका करणाऱ्या भाजपला, “तुम्ही शिवसेनेबरोबर सत्तेत असताना या योजनेला विरोध का केला नाही? तेव्हा काढलेले जाहीरनामे तपासा आणि मग बोला,” असा टोलाही त्यांनी लगावला.
“शहराच्या कामांना स्थगिती देणारे तुमचे सरकार, कामात अडथळे आणणारे तुमचेच मालक आणि प्रत्येक पालकमंत्र्याबद्दल तक्रार करणारे तुमचेच नेते. या तक्रारी शुद्ध भावनेने होत्या की त्यामागेही टक्केवारीचेच कारण होते, हे जनतेला समजले आहे,” असे म्हणत गुरव यांनी भाजपवर निशाणा साधला. “त्यामुळे आपल्या मालकांना मिळणारे १५ टक्के गेल्याचे एवढे दुःख व्यक्त करू नका,” असा चिमटाही त्यांनी काढला.
“तुमचे मालक फक्त विकास कामातच नव्हे, तर उमेदवारांकडूनही वसुली करतात. याचा अनुभव तुमच्या पक्षाच्या जिल्हा निरीक्षक असलेल्या आमदारांना आला होता, म्हणूनच त्यांना उमेदवारी नाकारली गेली होती. या जिल्ह्यात टक्केवारीची सुरुवात ज्या संस्थापकांनी केली, ते तुमचे मालकच आहेत,” अशी आठवणही सोमनाथ गुरव यांनी भाजपला करून दिली.
तुमचे मालक फक्त विकास कामातच टक्केवारी घेत नाहीत तर उमेदवाराकडून देखील वसुली करतात याचा अनुभव तुमच्या पक्षाचे जिल्हा निरीक्षक असलेले आमदार ( रमेश कराड यांचे नाव न घेता ) यांनी त्यामुळे उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे या जिल्ह्यात टक्केवारीची सुरवात ज्या संस्थापकांनी केली ते तुमचे मालक आहेत अशीही आठवण सोमनाथ गुरव यांनी करून दिली