तुळजापूर विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक एकदम रंगतदार होणार आहे. भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना शह देण्यासाठी आता नेते मंडळींची रांग लागली आहे. एरव्ही निवडणुकीत उमेदवारांची चुरस साधारण असते, पण यावेळी चुरस इतकी तगडी आहे की मतदारांचं चांगलंच मनोरंजन होणार आहे. तिकीट कुणाला मिळेल हे अजून तरी स्पष्ट नाही पण तयारी मात्र जोरात सुरु आहे.
सर्वात पहिला आणि चर्चेत असलेला उमेदवार म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण. आता हे नावं ऐकताच एक गोष्ट स्पष्ट होते की यांचं वय वर्षं ९० आहे. होय, चुकलात नाहीत! वयाच्या नव्वदीत पोहोचलेले चव्हाण साहेब अद्यापही ‘युवकांनाही लाजवतील’ अशा जोशात आहेत. मागच्या दोन निवडणुकांमध्ये त्यांनी लोकांना ‘ही माझी शेवटचीच निवडणूक’ असं म्हणत, एक प्रकारे गोंजारलं होतं, पण यंदा काहीतरी नवीन पॅटर्न घेऊन आलेत. “खंडोबा बळ देईल तोपर्यंत” असं म्हणत मैदानात उतरले आहेत, जणू काही त्यांच्या इच्छाशक्तीला वयाचं काही बंधनच नाही.
मधुकरराव चव्हाण यांचं वय जरी भरपूर असलं तरी उत्साहाने मात्र ते अजूनही ताजेतवाने किशोरवयीन वाटतात. हाच त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला धागा पकडून त्यांना ‘वयोवृद्ध किशोर’ ही नव्या पदवीसह सन्मान दिला आहे. चव्हाण साहेबांची अशी विनोदी बाजू पाहता, मतदारांमध्ये चर्चेचा नवा विषय झाला आहे की, या निवडणुकीत मधुकरराव साहेब पुन्हा एकदा आपला जुना अनुभव, उतारवयातील उत्साह आणि गप्पांचा ‘आस्मान’ दाखवून कितपत यशस्वी होतील?
काँग्रेसचे तिकीट नेमकं कुणाला मिळणार , हे कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही पण चव्हाण साहेबांनी पुन्हा शड्ड ठोकल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांनी धीर सोडला आहे.
दुसऱ्या बाजूला मैदानात आहेत अशोक जगदाळे, ज्यांना आपण ‘खुमखुमी उद्योगपती’ या नावाने ओळखतो. जगदाळे साहेब नेहमी मुंबईत राहतात, पण निवडणुकीची घंटा वाजली की त्यांना तुळजापूरची आठवण होते, आणि मग ते आपल्या उद्योजकीय चमक दाखवत अवतरण करतात. विधान परिषद आणि विधानसभा अशा दोन निवडणुकांमध्ये पराभूत होऊनही त्यांचा जोश अजूनही कायम आहे. यावेळी राष्ट्रवादीचे पंख लावून ते मैदानात उतरण्यास तयार आहेत. हा आत्मविश्वास बघून मतदारांना असा प्रश्न पडतोय की, “जगदाळे साहेब इतक्या पराभवानंतरही इतके खंबीर कसे?” कदाचित त्यांना हार स्वीकारायची सवय नाही, असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे.
बेलकुंडचे गोरे दाजी पुन्हा एकदा नशीब अजमावण्याचा तयारीत आहेत. ते झेडपी अध्यक्ष झाले, एसटी महामंडळाचे अध्यक्ष झाले पण आमदार होण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. डॉ. पद्मसिंह पाटील यांचे ते मेहुणे ! डॉक्टर साहेबांच्या कुपेने ते राजकारणात आले पण आता डॉक्टर साहेबांचे चिरंजीव राणा यांच्याविरुद्धच रणशिंग फुंकले आहे.
सक्षणा सलगर या तेरच्या ‘गुणगान’ व्यासपीठावरून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची यथोचित स्तुती करत तुळजापूरच्या राजकारणात आपला ठसा उमटवण्याच्या प्रयत्नात आहेत. सुप्रिया ताईच्या कृपेने आणि पवार साहेबांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादीचे तिकीट मिळेल या आशेने त्या सध्या जोरदार तयारीत आहेत आणि मतदारसंघात त्यांची हवा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटणीला जाणार असला तरी जगदाळे, गोरे दाजी, सक्षणा ताई यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
हगलूरचे अण्णासाहेब दराडे हे मात्र अगदी वेगळ्या धाटणीचे उमेदवार आहेत. ना पक्ष, ना बॅनर, ना मोठे नेते यांच्या आश्रयाखाली, दराडे यांनी ‘शुद्ध अपक्ष’ म्हणून तालुक्याच्या काना-कोपऱ्यात पिंजून काढलं आहे. निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरण्याची तयारी करून त्यांनी मतदारसंघात चांगलीच हलचल निर्माण केली आहे. राजकीय पक्षांपासून दूर राहून स्वतःच्या दमावर निवडणुकीचं रण लढणं हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे.
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत ‘हौसे, नवसे, गवसे’ या सगळ्यांनी तुळजापूरची रणधुमाळी रंगवली आहे. प्रत्येकजण आपापल्या ताकदीने मैदानात उतरलाय, आणि प्रत्येकजण तुळजाभवानीच्या आशीर्वादाची आस धरून आहे. पण आता खरा प्रश्न हा आहे की, या सगळ्या उमेदवारांपैकी तुळजाभवानीचं कौल कुणाला मिळणार?
तुळजाभवानीच्या कौलावरचं सर्वांचं लक्ष आहे. मतदारांनी दिलेल्या समर्थनावरच हे उमेदवार भविष्यातील राजकीय यशाचं आस्मान गाठतील, नाहीतर या मैदानातच शरणागती पत्करतील, हे पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे.
– बोरूबहाद्दर