मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून बंडखोरी करत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी धक्का दिला आहे. पराभूत आमदारांमध्ये सदा सरवणकर, यामिनी जाधव, शहाजीबापू पाटील, संजय रायमूलकर, आणि उमरग्याचे ज्ञानराज चौगुले यांचा समावेश आहे.
उमरगा मतदारसंघात चौगुले यांना मतदारांचा दणका
उमरगा मतदारसंघात सलग तीन वेळा विजयी झालेले ज्ञानराज चौगुले यांना यंदा पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रवीण स्वामी यांनी 3,965 मतांनी चौगुले यांचा पराभव केला. स्वामी यांना 96,206 मते मिळाली, तर चौगुले यांना 92,241 मतांवर समाधान मानावे लागले.
राज्यात महायुतीची लाट नव्हे सुनामी असताना, ज्ञानराज चौगुले यांचा पराभव हा त्यांना आत्मचिंतन करणारा ठरला आहे. चौगुले यांच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमरग्यात आले होते. चौगुले यांना निवडून दिल्यास त्यांना मंत्री करण्याचे आश्वासन दिले होते. तरीही मतदारांनी चौगुले यांना पराभवाची धूळ चारली. मराठा, लिंगायत, मुस्लिम यांची मते स्वामी यांच्या पारड्यात पडल्याने चौगुले यांचा पराभव झाला.
चौगुले यांचा हा पराभव मतदारांच्या नाराजीचे प्रतीक ठरला आहे. 2009 मध्ये जेव्हा चौगुले यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. तेव्हा एक गरीब व्यक्ती म्हणून लोकांनी पैसे गोळा करून, त्यांना मदत केली होती आणि निवडून आणले होते. गेल्या काही वर्षात त्यांनी अमाप पैसा जमवला. मुलांचे लग्नात लाखो रुपयाची उधळपट्टी केली. अनेक ठिकाणी जमिनी घेतल्या. त्या लोकांच्या लक्षात येताच, लोकांनी यांच्याविरुद्ध उभ्या असलेल्या प्रवीण स्वामी यांच्यासाठी पैसे गोळा करून, चौगुले यांना धडा शिकवला . त्यांनी मिळवलेली संपत्ती, अहंकार, स्थानिकांशी तुटलेला संपर्क, आणि भाजप कार्यकर्त्यांकडे ठेवलेली सापत्न वागणूक यामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.विशेष म्हणजे, चौगुले यांच्या विरोधात मतदारांनी आर्थिक मदत करत, त्यांच्या पराभवाची योजना आखली. भाजपसोबत युती असूनही चौगुले यांच्यावरील स्थानिक संतापामुळे उमरग्याच्या जनतेने महायुतीची लाट डावलली.
धाराशिव लाइव्हचे भाकीत खरे ठरले
चौगुले यांच्या पराभवाबाबत धाराशिव लाइव्हने यापूर्वीच डेंजर झोनचा इशारा दिला होता, जो तंतोतंत खरा ठरला. उमरगा मतदारसंघातील बदललेल्या राजकीय समीकरणांचे प्रतिबिंब या निकालात दिसून आले.