उमरगा,– उमरगा शहरात गुंडानी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या गुंडानी शनिवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास आदर्श विद्यालय परिसर ते साने गुरुजी नगरमधील १५ ते २० चारचाकी, दुचाकी वहानांच्या काचा फोडून चुराडा केला. केवळ दहशत निर्माण करण्यासाठी गुंडानी हे कृत्य केले असले तरी पोलीस त्यांच्या नांग्या ठेचणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.
शनिवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास काही अज्ञात गुंडानी आदर्श विद्यालय परिसर ते साने गुरुजी नगरमधील १५ ते २० चारचाकी, दुचाकी वहानांच्या काचा फोडून नुकसान केले. त्यात विजय माने यांची कार (क्र टी एस ०७ एफ एस१२५५), रणजित कटके यांचा टेम्पो (क्र. एम एच २५ पी ४८९८), आशिष इंगळे (क्र. एम एच २५ ए ७ / ७१३३), जावेद पटेल (एम एच २५ ए जे, ५२७०), मनोज गायकवाड (एम एच२५ ई ७४९) व्यंकट पेठसांगवीकर (एम एच१३ ए व्ही १००७), आर. एल. चव्हाण (एम एच २५ आर ७९३२) यांचा समावेश आहे.
रविवारी सकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांत घबराट निर्माण झाली, नुकसान झालेल्या वाहनमालकांनी पोलिस ठाणे गाठुन झालेला प्रकार सांगितला. या प्रकरणी रणजीत कटके यांच्या फिर्यादीनुसार अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलिस निरीक्षक डी.बी. पारेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
उमरगा शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत, मटका आणि गुटखा राजरोस सुरु आहे. पोलीस वसुलीत दंग आहेत, त्यामुळे गुंडानी दबंगगिरी सुरु केली आहे. पोलीस हतबल आहेत तर नागरिक त्रस्त आहेत.