तुरोरी (ता. उमरगा): मेडिकल दुकानाचा मालक जेवणाचा डब्बा आणण्यासाठी घरी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने दुकानाच्या गल्ल्यातून तब्बल १ लाख २५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना २९ मे रोजी तुरोरी येथे घडली असून, याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यंकट अंजनया स्वामी (वय ५४, रा. तुरोरी) असे फिर्यादी मेडिकल व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी यांचे तुरोरी गावात ‘ईश्वर मेडिकल स्टोअर’ नावाचे दुकान आहे. २९ मे २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास ते दुकान उघडे ठेवून जवळच असलेल्या आपल्या घरी जेवणाचा डब्बा आणण्यासाठी गेले होते.
ते परत दुकानात आले असता त्यांना गल्ल्यातील रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले. अज्ञात व्यक्तीने स्वामी यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन गल्ल्यात ठेवलेली १ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
या घटनेनंतर व्यंकट स्वामी यांनी १६ जून रोजी उमरगा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
पाटोदा येथून दिवसाढवळ्या मोटारसायकल चोरीला; बेंबळी पोलिसात गुन्हा दाखल
बेंबळी : पाटोदा (ता. तुळजापूर) येथून दिवसाढवळ्या एक मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नानासाहेब चंद्रसेन लोखंडे (वय ३६, रा. मेसाई जवळगा, ता. तुळजापूर) यांनी त्यांची अंदाजे १५,००० रुपये किमतीची हिरो कंपनीची मोटारसायकल (क्र. एमएच २५ झेड ३२३१) दि. ०८ जून २०२५ रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास पाटोदा येथे उभी केली होती.
या वेळेत अज्ञात व्यक्तीने त्यांची मोटारसायकल चोरून नेली. बराच वेळ शोध घेऊनही मोटारसायकल सापडली नाही.
अखेर, नानासाहेब लोखंडे यांनी काल, दि. १६ जून २०२५ रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.