भूम – तालुक्यातील वंजारवाडी येथील तरुण शेतकरी बालाजी भालचंद्र जगदाळे यांचा शनिवारी दुपारी विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. गावातील विद्युत रोहित्रावर काम करत असताना दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते खाली कोसळले.
घटनेनंतर त्यांना तातडीने भूम येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. दुर्दैवाने, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर वंजारवाडीतील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. बालाजी यांच्या मृत्यूला महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बालाजी यांचा मृतदेह भूम येथील महावितरणच्या कार्यालयात आणून ठेवला. यावेळी महावितरणचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांचा संताप अधिकच वाढला.
परिस्थिती तणावपूर्ण बनत असल्याचे समजताच पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी तातडीने पोलीस कर्मचाऱ्यांसह महावितरण कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मृत्यूला जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह हलवणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. अखेर, रात्री उशिरा सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह वंजारवाडी येथे नेला.
रविवारी (दिनांक ६ एप्रिल रोजी) सकाळी बालाजी जगदाळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बालाजी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे वंजारवाडी गावावर शोककळा पसरली आहे.