वाशी – वाशी तालुक्यातील इंदापूर येथे रविवारी पहाटेच्या सुमारास चार सशस्त्र चोरट्यांनी धुडगूस घालत घरातील तीन महिलांना लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्यांच्या अंगावरील व घरात ठेवलेले दागिने आणि रोकड असा अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२६ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास चार चोरटे प्रल्हाद कवडे यांच्या घरी आले. त्यांनी दरवाजा वाजवल्यावर संतोषी कवडे दार उघडण्यासाठी गेल्या असता चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून अंगावरील दागिने हिसकावून घेतले. यावेळी त्यांच्या आईलाही मारहाण करून अंगावरील दागिने लंपास केले. घरातील गोंधळ ऐकून शेजारच्या रुक्मिणी काशीद बाहेर आल्या असता त्यांनाही चोरट्यांनी मारहाण केली.
दरम्यान, इतर चोरट्यांनी घरातील पत्र्याच्या पेट्यांमधून दोन लाख रुपये रोख हस्तगत केले. या घटनेत चोरट्यांनी २९ ग्रॅम सोने आणि रोख असा एकूण २ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
वाशी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक सावंत तपास करत आहेत. श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी केली. श्वानाने चोरी झालेल्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावरील एका हॉटेलपर्यंत माग काढला. त्यामुळे चोरटे हॉटेलपासून वाहनाने पसार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.