नळदुर्ग : सोलापूर – उमरगा हमरस्त्यावरील बाभळगाव पुलाखाली सोमवारी आढळलेल्या तीन मृतदेहांच्या घटनेचा उलगडा अखेर झाला आहे. ही दुर्दैवी घटना अपघातामुळे घडल्याचे निष्पन्न झाले आहे. मृतांमध्ये एका पुरुषासह दोन महिलांचा समावेश आहे.
मृतांची ओळख पटली
या मृतांची ओळख मुरूमजवळील आनंदनगर येथील रहिवासी म्हणून पटली आहे. मृतांमध्ये आयुब मोहम्मद नदाफ (५५), जयाबाई लक्ष्मण कांबळे (४५), आणि रेश्मा हुसेन व्हटगी (३४) यांचा समावेश आहे.
अपघाताचा अंदाज
शनिवारी अथवा रविवारी रात्री सोलापूरहून मुरूमकडे मोटारसायकलवर ( क्रमांक एमएच १३, सीई ०८१० ) परतताना अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे मोटारसायकलवरील तिघेही पुलाखालील पाण्यात कोसळले. ही घटना रात्रीच्या अंधारात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.पोलिसांनी मृतदेहाबरोबर मोटारसायकल पाण्यातून बाहेर काढली आहे. तिन्ही मृतदेहाचे शवविच्छदेन करण्यात आले आहे.
पुलावरील सुरक्षा दुर्लक्षित
सोलापूर-उमरगा राष्ट्रीय महामार्ग हा चार पदरी असून यावर टोलवसुली केली जाते. मात्र, बाभळगाव पुलावर संरक्षण कठडा नसल्याने वारंवार अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कठडा नसल्यामुळे वाहनचालकांना नियंत्रण ठेवणे कठीण जाते, आणि परिणामी अशा दुर्दैवी घटना घडतात. संबंधित विभागाकडून पुलावरील सुरक्षेकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
स्थानिकांचा रोष
या दुर्घटनेनंतर स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. “रस्त्यांवर टोलवसुली केली जाते, मात्र सुरक्षेच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जाते,” असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार अपघात घडूनही उपाययोजना होत नसल्याने प्रशासकीय यंत्रणेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
अपघात टाळण्यासाठी उपाययोजना गरजेच्या
बाभळगाव पुलासह महामार्गावरील धोकादायक भागांवर तातडीने संरक्षण कठडे उभारण्याची मागणी जोर धरत आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा आणखी निष्पाप जीवांना याची किंमत मोजावी लागेल.
हेही वाचा ; बाभळगाव ते जळकोट: यमाच्या रस्त्याची दाहकता !
Video