छत्रपती संभाजीनगर: धाराशिव तालुक्यातील वरवंटी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. विद्यमान सरपंच सौ. विमल शिवाजी देशमुख यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत कारभारात अनियमितता आढळल्याने त्यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र घोषित केले होते.
या निर्णयाला आव्हान देत सौ. देशमुख यांनी मंत्र्यांकडे अपील केले होते. हे अपील प्रलंबित असतानाच तहसीलदारांनी सरपंच व उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया सुरू केली. त्याविरोधात सौ. देशमुख यांनी ॲड. सुजित पाटील यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने २७ जानेवारी रोजी याचिकाकर्त्याचे म्हणणे ग्राह्य धरत २८ जानेवारी रोजी होणारी सरपंच निवड प्रक्रिया स्थगित केली. मात्र, ही स्थगिती फक्त सरपंच पदाच्या निवडीसाठी असल्याने उपसरपंच निवडीची प्रक्रिया सुरू राहणार आहे.