धाराशिव – जिल्ह्यात जनावरांची निर्दयतेने वाहतूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर, तर गोवंशीय मांस बाळगून विक्री केल्याप्रकरणी आणखी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी आणि तामलवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या घटना घडल्या.
- जनावरांची निर्दयतेने वाहतूक
फैज्जान सरताज कुरेशी (वय 19, रा. खडकपुरा कुरेशी गल्ली, धाराशिव) याने बोलेरो पिकअपमधून आठ जर्सी कालवडींना निर्दयपणे वागवून त्यांची वाहतूक करत होता. कालवडींना दाटीवाटीने बांधून त्यांच्या चाऱ्या-पाण्याची कोणतीही सोय न करता त्यांची कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक करत असताना वाशी पोलिसांनी त्याला सुपाडी फाट्यावर रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्याच्या गाडीसह एकूण 4,80,000 रुपयांचा माल जप्त केला आहे. कुरेशीवर प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- गोवंशीय मांस विक्री
नजीर अंबीर कुरेशी (वय 46, रा. काटी, ता. तुळजापूर) याच्या घराजवळच्या दुकानात गोवंशीय मांस विक्रीसाठी ठेवले होते. तामलवाडी पोलिसांनी छापा टाकून सुमारे 30 किलो मांस जप्त केले, ज्याची किंमत 4,500 रुपये आहे. कुरेशीवर महाराष्ट्र प्राणी सुरक्षा अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.