वाशी (धाराशिव) – ग्रामीण रुग्णालयात एका रुग्णाचा ताप चढलेला होता, पण त्याच्या आधीच डॉक्टरांचा ‘हाय स्पिरिट’ तापलेला होता! शनिवारी रात्री वाशी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूळ मद्यधुंद अवस्थेत दिसले. विशेष म्हणजे, ते थेट दारू पिऊन रुग्णालयात हजेरी लावली, पण उपचार करण्या ऐवजी त्यांनी ‘पळण्याचा उपचार’ केला!
श्रीमंत कवडे यांच्या मुलाला ताप आल्याने रुग्णालयात आणले, पण डॉक्टरांना मात्र ‘उष्णते’ची दुसरीच कारणं असावीत. पेशंटच्या आई-वडिलांनी तपासणीची विनंती केली, तर डॉक्टरसाहेब म्हणाले, “तुम्ही खासगी रुग्णालयात टेस्ट केली ना? मग इथे कशाला आलात? जा, तिकडेच इलाज करा!” अशा उत्तराने कुटुंबीय अवाक् झाले.
पुढे संशय बळावल्याने लोकांनी विचारलं, “डॉक्टरसाहेब, तुम्ही दारू प्यायली आहे का?” त्यावर ते एकदम “माझे कुणी वाकडे करू शकत नाही!” असे दांडपट्टा स्टाईल उत्तर देऊन सटकले! म्हणजेच, डॉक्टरांचा पेशंट तपासायचा ‘मूड’ नव्हता, पण त्यांना स्वतःला कोण ‘तपासत’ आहे याची फुल्ल जाणीव होती!
दरम्यान, याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयातही असाच ‘दारूधुंद’ प्रकार घडला होता. पण जिल्हा आरोग्य अधिकारी मात्र ‘मग गिळून’ गप्प बसलेत!
डॉक्टरांचा हा ‘हाय स्पिरिट’ टप्प्याटप्प्याने वाढत असेल, तर भविष्यात रुग्णलयातच ‘वाइन टेस्टिंग’ सुरू होईल की काय, अशी भीती ग्रामस्थांना वाटू लागली आहे. आता पाहायचं, या डॉक्टरांना ‘हँगओव्हर’ उतरल्यावर कारवाई होते का, की ही केसही ‘फुल टॉस’ जाईल?