वाशी पोलिसांनी रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक केली आहे. आरोपींकडून तलवार, कुऱ्हाड, दोरी, काळे तिखट आणि विना नंबरची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 13 सप्टेंबर 2024 रोजी रात्री साडेबारा ते पावणे एक वाजण्याच्या सुमारास वाशी गावातील नाईकवाडे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाच संशयित व्यक्ती दिसल्या. पोलिसांना पाहताच त्यांनी मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना पकडले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राम उर्फ बबलु शिवाजी शिंदे (२३ वर्षे), राहुल उर्फ बबलु अर्जुन काळे (२५ वर्षे), राहुल अनिल काळे (१९ वर्षे), सचिन उर्फ आबा राम काळे (सर्व रा. खामकरवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) आणि एक अनोळखी इसम यांचा समावेश आहे.
पोलीस अंमलदार प्रवीण बबन साठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाशी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९९ सह ४, २५ शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.