वाशी : गोलेगाव (ता. वाशी) शिवारातील पवनचक्की प्रकल्पावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या टोळीने गस्तीवर असलेल्या सुरक्षारक्षकावर दगडफेक केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पळून जाणाऱ्या एका आरोपीला तलवार आणि लोखंडी कत्तीसह पकडण्यात यश आले असून, त्याचे तीन साथीदार पळून गेले आहेत. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध दरोड्याच्या पूर्वतयारीचा आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील गोलेगाव शिवारात असलेल्या पवनचक्की क्रमांक डब्ल्यू.एस.एच ०१ (W.S.H 01) येथे शुक्रवारी (ता. १० एप्रिल) पहाटे ३ ते पावणेपाच वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. साई सिक्युरिटी इंटिग्रेटेड कंपनीचे (तेरखेडा) पेट्रोलिंग कर्मचारी दत्तात्रय कागदे हे गस्तीवर असताना दोन विनाक्रमांक मोटारसायकलवरून चार इसम त्या ठिकाणी आले. त्यांनी ड्युटीवर असलेल्या कागदे यांच्यावर अचानक दगडफेक सुरू केली.
यावेळी सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून प्रतिकार केला असता, आरोपी पळून जाऊ लागले. मात्र, पळून जाणाऱ्यांपैकी राहुल रामचंद्र काळे (मूळ रा. रामेश्वरवाडी, ता. केज, जि. बीड, सध्या रा. पारगाव, ता. वाशी) याला मोटारसायकलसह पकडण्यात आले. त्याच्याकडे दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीसाठी आणलेले तलवारसदृश शस्त्र आणि लोखंडी कत्ती असा मुद्देमाल मिळून आला.
या घटनेप्रकरणी साई सिक्युरिटी कंपनीचे सुरक्षारक्षक पर्यवेक्षक शिवहार बाळकृष्ण राऊत (वय ३४, रा. वाणी गल्ली, वाशी, जि. धाराशिव) यांनी शनिवारी (ता. ११ एप्रिल) वाशी पोलिस ठाण्यात प्रथम खबर दिली.
यावरून रंगेहाथ पकडलेला आरोपी राहुल काळे याच्यासह पळून गेलेले त्याचे साथीदार राजू अर्जुन पवार (रा. हिवरा), दादा शामराव काळे (रा. बारलोणी पारधी पिढी, ता. वाशी) आणि चिवल्या ऊर्फ बबन सोपान काळे (रा. खैराड वस्ती, वाशी, जि. धाराशिव) यांच्यावर भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम ३१०(४) सह शस्त्र अधिनियम (Arms Act) ४/२५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलिस करत आहेत.







