धाराशिव – दिवाळी संपली, निवडणुका पार पडल्या, मंत्रीमंडळ शपथ घेऊन फुल टशनमध्ये कामाला लागलं, आणि आता अचानक प्रशासनाने निवडणुकीत ‘शूट’ केलेल्या रीलकडे लक्ष केंद्रित केलंय. या सगळ्या गोंधळात आपले शिक्षण सम्राट सुधीर पाटील मात्र सोशल मीडियावर ट्रेंड होतायत, पण यावेळी त्यांच्या रीलमुळे नाही, तर त्या रीलमुळे गुन्हा दाखल झाल्यामुळे!
सुधीर पाटील यांनी निवडणुकीच्या दिवशी आपला मतदानाचा क्षण ‘कॅप्चर’ केला आणि त्यावर एक दमदार रील बनवली. रील बनवायला वेळ लागला नसेल, पण निवडणूक आयोगाला गुन्हा दाखल करायला सव्वा महिना लागलाय. त्यामुळे ही बातमी सोशल मीडियावर ‘गुन्हा दाखल व्हर्सेस विलंब का?’ या चर्चेचा विषय ठरत आहे.
आचारसंहितेचा ‘रील’ ब्रेक
नियम स्पष्ट आहेत – मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत मोबाईलला ‘नो एंट्री’. पण पाटलांनी नियम तोडला म्हणायचं, तरी व्हिडिओमध्ये ना बटन दिसतं, ना मत. तरीही ‘आचारसंहिता भंग’ हा गुन्हा झालाच, असं निवडणूक आयोगाचं म्हणणं. आता प्रश्न असा की, जेव्हा सगळं इतकं स्पष्ट आहे, तेव्हा कारवाईला सव्वा महिना का लागला?
गुन्हा ‘विलंब’ फाईल
20 नोव्हेंबरला घटना घडली, 25 डिसेंबरला गुन्हा दाखल. निवडणूक आयोगाच्या या ‘स्पीड’वर आता विनोदी मेम्स तयार होऊ लागलेत. लोक म्हणतायत, “हा गुन्हा रीलसाठी नव्हता, तर निवडणूक आयोगाने स्वतःच्या कारवाईची रील बनवली असावी!”
सुधीर पाटलांच्या अडचणींची ‘प्ले-लिस्ट’ वाढतेय
नुकतंच पुतळा प्रकरण संपलंय, आणि आता ही नवीन ‘रील’ प्रकरणाची एंट्री झालीय. पाटलांच्या राजकीय जीवनात गुन्हेगारीच्या नोंदींची लांबलचक यादी बनू लागली आहे. या सर्वात, पाटील स्वतः कसा रिस्पॉन्स देतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
जनतेचा प्रतिसाद
सोशल मीडियावर या घटनेवरून जोरदार चर्चा सुरु आहे. एका वापरकर्त्याने लिहिलंय, “सुधीर पाटील यांनी तर फक्त रील बनवली, पण निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करून स्वतःची मजेदार ‘रिअॅलिटी शो’ सुरु केलाय!”
शेवटी, प्रश्न एकच आहे – रील बनवणं गुन्हा आहे की सव्वा महिना उशीराने गुन्हा दाखल करणं हे जास्त मोठं हास्यास्पद आहे?
तर पाहुया, पुढे काय होतं – सुधीर पाटलांच्या रीलचा शेवट कसा होतो, ते!
हेच ते रील , पाहा