येरमाळा – कळंब तालुक्यातील वाघोली येथे जुन्या वादातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना १६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी घडली. या घटनेत दोन्ही गटांतील व्यक्ती जखमी झाले असून, दोन्ही बाजूंनी येरमाळा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही तक्रारींवरून गुन्हे दाखल केले असून, अधिक तपास सुरू आहे.
पहिली तक्रार – दारूच्या वादातून मारहाण:
पहिल्या तक्रारीनुसार, वाघोली येथील संभाजी महादेव धोंगडे (वय ४६) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १६ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ ते पावणेनऊच्या सुमारास दारू पिण्याच्या कारणावरून आणि आदल्या रात्री शहाजी धोंगडे यांनी दिलेल्या धमकीवरून झालेल्या वादातून शहाजी भागवत धोंगडे, त्यांचे मुलगे सौरभ शहाजी धोंगडे आणि शुभम शहाजी धोंगडे यांनी त्यांना व त्यांचे भाऊ रामराजे धोंगडे यांना मारहाण केली. फिर्यादीनुसार, शहाजी धोंगडे यांनी लाकडी काठीने, सौरभ धोंगडे याने काठीने आणि शुभम धोंगडे याने धारदार लोखंडी कुऱ्हाडीने मारहाण केली. या मारहाणीत संभाजी धोंगडे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला कुऱ्हाडीचा वार लागला आहे. त्यांना उपचारासाठी बार्शी येथील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यावेळी गावातील धनाजी महाडीक आणि शाम कोळी यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले, असे फिर्यादीत नमूद आहे.
दुसरी तक्रार – जुन्या भांडणातून हल्ला:
दुसऱ्या बाजूने, शहाजी भागवत धोंगडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ एप्रिल रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास वाघोली बस स्टँड चौकातील एका चिकन सेंटरसमोर त्यांचा मुलगा शुभम शहाजी धोंगडे (वय २६) याला आरोपी नामे- संभाजी विठ्ठल धोंगडे, रामराजे महादेव धोंगडे, महादेव विठ्ठल धोंगडे आणि संतोष महादेव धोंगडे (सर्व रा. वाघोली) यांनी मागील भांडणाच्या कारणावरून अडवले. पुढे आरोपींनी शुभमला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉड व काठीने त्याच्या डोक्यात गंभीर मारहाण केली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या शहाजी धोंगडे यांनाही आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली, असे या तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांकडून दोन्ही बाजूंवर गुन्हे दाखल:
या दोन्ही घटनांसंदर्भात येरमाळा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १०९, ११८(१), ११८(२), ३५२, ३५१(२), आणि ३(५) अन्वये हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सहायक पोलीस उपनिरीक्षक पवन शाहूराव निंबाळकर यांच्यासह येरमाळा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. दोन्ही गटांच्या तक्रारींवरून पोलिसांनी तपास सुरू केला असून, घटनेमागचे नेमके कारण आणि दोषी कोण याचा पोलीस शोध घेत आहेत.