धाराशिव- जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागाच्या तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीकडून विविध यंत्रणांना निधी उपलब्ध करून देण्यात येतो. यंत्रणांनी विविध विकास कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करून निधी खर्च करावा तसेच विविध योजना योजनेच्या लाभार्थ्यांना देखील वेळेतच योजनांचा लाभ द्यावा. असे निर्देश पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिले.
जिल्हा नियोजन समितीचे सभा आज 18 जुलै रोजी नियोजन समिती सभागृह येथे आयोजित करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून प्रा. डॉ.सावंत बोलत होते.सभेला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार सर्वश्री विक्रम काळे,राणा जगजीतसिंह पाटील,कैलास पाटील घाडगे,ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,समितीचे विशेष निमंत्रित सदस्य महेंद्र धुरगुडे, नवनाथ जगताप व महेंश नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
धाराशिव जिल्हा नियोजन समिती बैठकीचे मुद्दे:
निधी वाटप आणि विकास कामे:
- जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये विविध योजनांच्या लाभार्थ्यांसाठी निधी वाटप करण्यात येईल.
- सर्व यंत्रणांनी निधी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण कामांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे.
- नगरपालिका यंत्रणांनी अद्याप पूर्ण न झालेल्या कामांना गती द्यावी आणि दर्जेदार कामे करावीत.
- तीन महिन्यात स्मशानभूमीची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईल.
- महावितरण विभागाने तातडीने आवश्यक ठिकाणी रोहित्र लावून वीजपुरवठा सुधारण्याची आवश्यकता आहे.
- शेतकऱ्यांना वेळेत आणि अडचणीशिवाय पीक कर्ज मिळेल याची खात्री करावी.
- ज्या राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
इतर मुद्दे:
- धाराशिव शहरातील 2020 ते 2023 पर्यंतच्या कामांची गुणवत्ता सुधारण्याची आवश्यकता आहे.
- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा आणि आवश्यक तेवढे रोहित्र उपलब्ध व्हायला हवे.
- बँकांनी शेतकऱ्यांना सिबिलच्या अडथळ्यांशिवाय पीक कर्ज द्यावे.
- जिल्हा वार्षिक योजना 2023-24 आणि 2024-25 मधील निधी खर्चाचा आढावा घेण्यात आला.
- पंढरपूर येथील 14.25 लाख भाविकांची आरोग्य तपासणी करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याबद्दल आरोग्य विभागाचे अभिनंदन करण्यात आले.