विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकीचा मौसम सुरु झाल्यामुळे धाराशिव जिल्ह्यात प्रत्येक गावातील चहा टपरीवर चर्चा एकच – “आप्पा निवडणूक लढणार का? आण्णा फॉर्म भरतील का? भैय्या यांना पुन्हा संधी मिळणार का?”
धाराशिव विधानसभा मतदारसंघ: शिंदे गट आणि भाजपचे नेते आता रोज एकमेकांना “तुमच्या अंगात किती बळ आहे?” याचे प्रमाणपत्र देत आहेत. त्यात ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे शिंदे गट आणि भाजप यांच्यात चालू असलेली कोंबडीची झुंज पाहून मनातल्या मनात हसत आहेत. एकीकडे नव्याने शिंदे गटात आलेले “आप्पा” यांना रात्री स्वप्न पडतंय की ते विधानसभेत गाठीशी कार्यकर्ते घेऊन चाललेत, दुसरीकडे आण्णा विचार करतायत, “आपलं आता तरी नशीब लागेल का?”
तुळजापूर मतदारसंघ: भाजपचे आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या भोवती आधीच ताई-दाजींनी बेत लावून ठेवले आहेत. भाऊंच्या तोंडून फक्त एकच प्रश्न – “माझा नंबर कधी येणार?” इतकेच नाही, तर ८५ वर्षीय जुने साहेब, ज्यांना “तुम्ही निवडणूक सोडा” सांगितलं तरी तेच म्हणतात, “अरे, हा माझा अखेरचा घोडा आहे!” साहेबांना धावण्याचं काही सोडायचं नाही, त्यांची तगडी इच्छा आहे की पुन्हा एकदा विधानसभेत जाण्याचं स्वप्न पूर्ण करायचं.
परंडा मतदारसंघ: येथे शिंदे गटाचे आ. तानाजी सावंत यांच्या विरोधात ठाकरे गटाचे तात्या आणि राष्ट्रवादीचे भैय्या एकत्र आलेत. पण ही निवडणूक नाही, तर जणू कुस्तीची आखाडा झालाय! तात्या आणि भैय्या दोघेही गावाच्या क्रीडांगणात रोज कुस्तीची तयारी करतायत आणि तानाजी सावंत मैदानात “हे सगळे फेकुना मागे ठेवीन” अशा निर्धाराने उतरलेत.
उमरगा मतदारसंघ : येथे शिंदे गटाचे आ. ज्ञानराज चौगुले यांना घेरण्यासाठी ठाकरे गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यात कुस्ती सुरु झाली आहे. प्रत्येकजण म्हणतोय मीच चौगुलेना आस्मान दाखवू शकतो, पण मागील तीन निवडणुकात अनेकजण उताणे पडलेत. प्रत्येक निवडणुकीत नवा भिडू रणांगणात उतरतोय, आता कुणाचा नंबर लागेल, याची चर्चा सुरु आहे.
अपक्षांची तयारी: अनेक अपक्ष तयार आहेत! कोण बाशींग लावून तर कोण टोपी घालून मैदानात उतरायला उत्सुक आहेत. फक्त मतदारसंघातील इथला प्रत्येक जण आता एका प्रश्नावर एकवटला आहे – “यावेळी कोण आमदार होईल?” आणि दुसरं – “भाऊंची, ताईंची आणि आप्पांची आता लॉटरी लागेल का?”
आता इकडे मतदार म्हणतात, “राजकारणी लोकांना बघून आमचं डोकं फिरतं, पण या सर्कशीतलं कोण जिंकेल, हे पाहायला मजा येईल!”
- बोरूबहाद्दर