येरमाळा : जमीन दाखवून खरेदीचा व्यवहार ठरल्यानंतर तब्बल २ कोटी २० लाख रुपये घेऊनही, ती जमीन दुसऱ्यालाच विकून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैसे परत मागितल्यावर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संदीपान बाबासाहेब मते (वय ५०, रा. दहिफळ, ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. आरोपींनी मते यांना एक जमीन दाखवली होती. हा व्यवहार निश्चित झाल्यानंतर मते यांनी जमीन खरेदी करण्यासाठी आरोपींना तब्बल २ कोटी २० लाख रुपये दिले. हा सर्व प्रकार १ जानेवारी २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडला. मात्र, एवढी मोठी रक्कम घेऊनही आरोपींनी सदरील जमीन मते यांच्या नावावर केली नाही.
त्याऐवजी, मते यांच्याशी जमिनीचा व्यवहार झाल्याचे खरेदीदारांना पूर्णपणे माहीत असतानाही, आरोपींनी संगनमत करून ती जमीन परस्पर दुसऱ्याच व्यक्तींना विकली. आपली आणि आपल्या भावाची मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी संदीपान मते हे आरोपींकडे पैसे परत मागण्यासाठी गेले. यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
अखेर याप्रकरणी संदीपान मते यांनी शनिवारी (ता. ११ एप्रिल) येरमाळा पोलिस ठाण्यात धाव घेत रीतसर प्रथम खबर दिली. यावरून पोलिसांनी दत्तात्रय गोरख कागदे (रा. दहिफळ), राजेश नवनाथ अवधुत, सुनंदा नवनाथ अवधुत, गणेश राजेश अवधुत, संगीता राजेश अवधुत (सर्व मूळ रा. अवधुतवाडी, सध्या रा. भगवंत निवास, सुभाष नगर, बार्शी, जि. सोलापूर), कैलास शंकर कुटे (रा. दहिफळ), लता हनुमंत लंगडे आणि शेनाज हाजु मुलानी (दोघे रा. गौर, ता. कळंब, जि. धाराशिव) अशा एकूण आठ जणांवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६१(२), ३१६(२), ३५२, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येरमाळा पोलिस करत आहेत.







