येरमाळा : येडेश्वरी देवी यात्रेनिमित्त वाहतूक नियमन करत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करत, त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना येरमाळा येथे घडली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत ७ जणांवर येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, येरमाळा येथे येडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी असल्याने तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. ३ एप्रिल रोजी सायंकाळी १७.३० वाजेच्या सुमारास लहुजी शक्ती सेना चौक ते तात्पुरत्या बसस्थानकासमोर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी धाराशिव पोलिस मुख्यालयातील पोलिस अंमलदार नरसिंग राजेंद्र गायकवाड (वय २६) हे इतर कर्मचाऱ्यांसह आपले शासकीय कर्तव्य बजावत होते.
वाहतूक मोकळी करत असताना एका कारच्या चालकाने (अमोल श्रीमंत चव्हाण) पोलिसांनी दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आणि गाडी पुढे दामटून सार्वजनिक सुव्यवस्थेला अडथळा निर्माण केला. तसेच त्याने जाणीवपूर्वक गायकवाड यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाडीतील इतर प्रवाशांनी खाली उतरून पोलिसांना त्यांच्या शासकीय कामापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने आरेरावी केली. तसेच पोलिसांना धक्काबुक्की करत शिवीगाळ व दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
याप्रकरणी नरसिंग गायकवाड यांनी ४ एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलिस ठाण्यात पुढील सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत:
१) अमोल श्रीमंत चव्हाण (कारचालक)
२) सचिन श्रीमंत चव्हाण
३) स्वामी सचिन चव्हाण
४) नमिता अमोल चव्हाण
५) महानंदा श्रीमंत चव्हाण (सर्व रा. गुंजेवाडी, पो. आंबेजवळगे, जि. धाराशिव)
६) राजश्री चंद्रकांत पवार
७) सुनीता कृष्णा जाधव (दोघी रा. प्रकाशनगर, लातूर)
या सर्वांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, ११५(२), ३५२, ३५१(२),(३), १८९(२) सह मोटार वाहन कायदा कलम १३२, १७९(१) आणि महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ११०, ११७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





