धाराशिव : बहिणीसोबत झालेल्या भांडणाची विचारणा केल्यावरून एका तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना धाराशिव येथे घडली आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील आरोपी जाकीर शब्बीर तांबोळी, बबलु कबीर तांबोळी, बारक्या तांबोळी, नौशाद तांबोळी आणि मुन्नी तांबोळी (सर्व रा. सांजा ता. जि. धाराशिव) यांनी फिर्यादी जिंदावली महताब शेख (वय २६, रा. उजणी ता. औसा जि. लातूर) यांना दि. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता सांजा येथे मारहाण केली.
फिर्यादी शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांच्या बहिणीसोबत झालेल्या भांडणाबद्दल विचारणा केली. याच कारणावरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांना व त्यांच्या आई-वडिलांना शिवीगाळ केली. तसेच, लाथा-बुक्क्या व स्टीलच्या पाईपने मारहाण करून जखमी केले. आरोपींनी फिर्यादीला जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली.
या मारहाणीत जखमी झालेल्या शेख यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी भा.दं.वि. कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 189(2), 191(1), 191(3) आणि 190 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास आनंदनगर पोलीस करत आहेत.