धाराशिव : किरकोळ अपघातावरून झालेल्या जुन्या वादाची चर्चा करण्यासाठी गेलेल्या तरुणावर आणि त्याच्या भावावर एका टोळक्याने लोखंडी पाईप, चाकू आणि फरशीच्या तुकड्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना धाराशिव शहरात घडली. शहरातील सुविधा हॉस्पिटलच्या जिन्यावर शुक्रवारी (ता. १३) रात्री आठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी रविवारी (ता. १५) आनंदनगर पोलिस ठाण्यात आठ जणांसह इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीराज चंद्रकांत पवार (वय २४, रा. दत्तनगर, तेरणा कॉलेजजवळ, धाराशिव) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी झालेल्या एका किरकोळ अपघाताच्या कारणावरून आरोपींनी श्रीराज पवार यांना मारहाण केली होती. या मागील भांडणाविषयी चर्चा करण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी शुक्रवारी रात्री श्रीराज, त्यांचा भाऊ आणि चुलते हे गेले होते.
यावेळी सुविधा हॉस्पिटलच्या जिन्याजवळ आरोपी ऋषीकेश शेंडगे, आप्पा शेंडगे, प्रदीप मुंडे, शंभू निंबाळकर, अनिरुद्ध भरडे, हरी वाघमारे, रणजित मुंडे, कृष्णा वाघमारे आणि इतर काही इसमांनी (सर्व रा. धाराशिव) बेकायदेशीर जमाव जमवला. त्यांनी श्रीराज आणि त्यांच्या भावाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी लोखंडी पाईप, चाकू आणि फरशीच्या तुकड्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
या जीवघेण्या हल्ल्यानंतर श्रीराज पवार यांनी रविवारी (ता. १५) आनंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या प्रथम खबरीवरून पोलिसांनी वरील सर्व आरोपींविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(२), ११५(२), १८९(२), १९१(२), १९०, ३५२, ३५१(२), (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आनंदनगर पोलिस करत आहेत.






