धाराशिव: धाराशिव शहरात एका तरुणाला विनाकारण मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. सुफियान बिलाल रजवी (वय २३, रा. शम्स चौक, धाराशिव) या तरुणाला १४ ऑक्टोबर रोजी रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान कचरा डेपो जवळ काही जणांनी शिवीगाळ करत लोखंडी कोयता, रॉड आणि फायटरने मारहाण केली. या हल्ल्यात रजवी गंभीर जखमी झाला असून त्याच्या खिशातील मोबाइल देखील चोरीला गेला आहे.
याप्रकरणी इजहान तांबोळी, सुलतान कुरेशी, बाळु छोटा कुरेशी, मोहतेशीन कुरेशी आणि शहाबाज तांबोळी (सर्व रा. धाराशिव) यांच्या विरोधात धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भा.न्या.सं.कलम 118(2),118(1), 119(1), 115(2), 189(2),190, 191(2), 191(3),352 अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
ईर्ला येथे शेतीच्या वादातून शेतकऱ्यांना मारहाण
धाराशिव जिल्ह्यातील ईर्ला येथे शेतीच्या वादातून शेतकरी पिता-पुत्राला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. भुजंग नारायण चौरे, सुरज भुजंग चौरे, धिरज उर्फ बाळ्या भुजंग चौरे आणि महादेव खांडेकर यांनी महामुद गफुर शेख (वय ६५) आणि त्यांचा मुलगा सैफुल शेख यांना शेतीच्या वादातून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण केली.
ही घटना १३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता ईर्ला शेत शिवारातील शेत गट क्रमांक २४ मध्ये घडली. आरोपींनी शेख पिता-पुत्राला गंभीर जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी महामुद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात १५ ऑक्टोबर २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भा.न्या.सं.कलम 118(2),118(1), 115(2), 352, 351(2),351(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
येरमाळा येथे अपंग तरुणाला मारहाण
येरमाळा – येथील कडकनाथवाडी येथे एका अपंग तरुणाला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकांत कपालेश्वर टेके (वय २७, रा. कडकनाथवाडी) हे तीन चाकी सायकलवरून जात असताना बंडू काशीनाथ जगताप (वय ४०, रा. कडकनाथवाडी) यांनी त्यांना अडवले. “तु तुझी अंपगाची तीन चाकी सायकलवर बसून रोडवर आडवा का थांबला अंपगा पांगळ्या” असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केले. एवढेच नव्हे तर जिवे मारण्याची धमकी देखील दिली.
श्रीकांत टेके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात बंडू जगताप यांच्याविरुद्ध भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3) सह अपंगव्यक्ती अधिकारी अधिनियम कलम 92(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.