बेंबळी: कनगरा शिवारात झालेल्या ट्रॅक्टर अपघातात एका 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुरज राजेंद्र गरड असे मृत तरुणाचे नाव असून तो वडगाव शिवाजी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव येथील रहिवासी होता.
दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सुरज गरड हा एमएच 24 बीक्स 1694 क्रमांकाचा ट्रॅक्टर घेऊन बोरखेडा-कनगरा रस्त्याने जात होता. त्याच्या ट्रॅक्टरला दोन रिकाम्या ट्रॉली जोडलेल्या होत्या. मंगल कदम यांच्या शेताजवळ आल्यावर त्याने ट्रॅक्टर हायगयी आणि निष्काळजीपणे चालवल्याने ट्रॅक्टरचे चाक खड्ड्यात गेले. यामुळे तो ट्रॅक्टरवरून खाली पडला आणि ट्रॅक्टरच्या टायरखाली दबला गेला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच बेंबळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयत सुरज गरड यांचे वडील राजेंद्र लिंबराज गरड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 281, 106(1) सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.