उमरगा – उमरगा तालुक्यातील माडज गावात रोटरचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तानाजी श्रीरंग काळे (वय ३०, रा. माडज) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. अंबादास विश्वंभर बनसोडे (रा. माडज) याने काळे यांना रोटरचे पैसे मागितले. त्यावरून वाद झाला आणि बनसोडे याने काळे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याने काळे यांना दगडाने मारहाण करून जखमी केले.
या घटनेनंतर काळे यांनी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बनसोडे याच्या विरोधात भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
एकोंडी येथे शेतजमिनीच्या वादातून मारहाण
लोहारा – एकोंडी येथील शेत गट क्रमांक 63/2 मध्ये जमिनीच्या वादातून एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना दि. 20 जानेवारी 2025 रोजी घडली. प्रेमकला आनंत सुर्यवंशी (वय 32, रा. एकोंडी) यांना धोंडीराम विठ्ठल सुरवसे, ऋषीकेश धोंडीराम सुरवसे आणि सुनंदा धोंडीराम सुरवसे (सर्व रा. एकोंडी) यांनी शेतात आल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुर्यवंशी यांची सासू भांडण सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही आरोपींनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी प्रेमकला सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाण्यात धोंडीराम सुरवसे, ऋषीकेश सुरवसे आणि सुनंदा सुरवसे यांच्याविरुद्ध भादंवि कलम 329(3), 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.