कळंब : कळंब तालुक्यातील मोहा येथे राजकीय वादातून एका ३३ वर्षीय तरुणाचे चारचाकी वाहनातून अपहरण करत त्याला तलवार, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत संबंधित तरुण आणि त्याचा भाऊ गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी पाच जणांविरोधात कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमर राजेंद्र मडके (वय ३३, रा. मोहा, ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रविवारी (ता. ५ एप्रिल) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अमर मडके हे कुंभार वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते. यावेळी जुन्या राजकीय वादाचा राग मनात धरून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला.
आरोपींनी अमर यांना रस्त्यात गाठून बळजबरीने एका चारचाकी गाडीत (क्र. एमएच २५ आर ६५३८) बसवले व अपहरण करून दुसरीकडे घेऊन गेले. तिथे नेऊन आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, तसेच तलवार, लोखंडी रॉड आणि काठीने अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात अमर मडके हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या त्यांच्या भावालाही आरोपींनी रॉडने मारहाण करून जखमी केले व दोघांनाही जिवे मारण्याची धमकी दिली.
या भयंकर घटनेनंतर अमर मडके यांनी बुधवारी (ता. ८ एप्रिल) कळंब पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बाबासाहेब प्रभू मडके, सोमनाथ रामदास मडके, मिलिंद रमेश वरपे, विशाल रमेश वरपे आणि सुरेश भीमराव वरपे (सर्व रा. मोहा, ता. कळंब) या पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४०(४), ११८(२), ११८(१), ११५(२), १८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३), १९०, ३५१(२) सह शस्त्र अधिनियम कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कळंब पोलीस करत आहेत. राजकीय वादातून झालेल्या या राड्यामुळे मोहा गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.





