भूम – वालवड येथे शेतातील मुरुम काढल्याच्या वादातून एका 35 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मयत तरुणाचे नाव भाऊसाहेब उर्फ भावड्या गुलच्या काळे असे असून तो वालवडचाच रहिवासी होता.
दि. 25 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सतिष नारायण शेलार यांच्या घराजवळ ही घटना घडली. दत्ता मोहिते, औदुंबर मोहिते, दत्ता मोहन शेलार, गौतम बलभिम मोहिते, सुधीर बलभिम खटाळ, सतिष नारायण शेलार, विठ्ठल मोहन शेलार (सर्व रा. वालवड) या आरोपींनी भाऊसाहेब काळे यांना शेतातील मुरुम का काढला, असे विचारले. यावरून वाद सुरू झाला आणि आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करत काळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दगड, लाकूड आणि लोखंडी रॉडने वार करून त्यांना ठार मारले.
या घटनेची माहिती मिळताच भुम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत भाऊसाहेब काळे यांच्या भावाने अमोल महाजन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींवर भा.न्या.सं. कलम 103, (1),189(2), 189(4), 190सह अ.जा.ज.अ.प्र.कायदा कलम 3(1)(आर), 3(1)(एस), 3(2)(व्हीए), 3(2) (व्ही) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी तपास सुरू केला आहे.