तुळजापूर – तुळजापूर शहरातील अमृतवाडी झोपडपट्टी परिसरात आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून एका २७ वर्षीय तरुणाला जातीवाचक हीन दर्जाची शिवीगाळ करत कोयता आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्राणघातक हल्ल्यात तरुण जखमी झाला असून, याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
शिवाजीनगर, हडको गल्ली (तुळजापूर) येथील रहिवासी संदेश हिरामण वाघचौरे (वय २७ वर्षे) हे १४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजेच्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळ अमृतवाडी झोपडपट्टी येथील किरण चितळे याच्या घराबाहेर थांबले होते.
त्यावेळी जुन्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून आरोपी किरण चितळे, बालाजी गायकवाड आणि अजय गायकवाड यांनी संदेश वाघचौरे यांना गाठले. आरोपींनी संगनमत करून संदेश यांना जातीवाचक हीन दर्जाची शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी आणि धारदार कोयत्याने मारहाण करून त्यांना जखमी केले तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
तिघांवर ॲट्रॉसिटी व BNS अंतर्गत गुन्हा नोंद
उपचार घेतल्यानंतर संदेश वाघचौरे यांनी १६ सप्टेंबर २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:
-
आरोपी : किरण चितळे (रा. पाण्याच्या टाकीजवळ झोपडपट्टी, अमृतवाडी, ता. तुळजापूर), बालाजी गायकवाड आणि अजय गायकवाड (दोघे रा. आरदवाडी, ता. तुळजापूर).
-
दाखल कलमे : भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा कलम ३(१)(आर), ३(१)(एस) आणि ३(२)(व्हीए).
या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर पोलीस करत आहेत.




