वाशी : वाशी तालुक्यातील पारगाव येथे शेतातील बांधाचा जुना वाद आणि लग्न मोडल्याच्या संशयावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही बाजूंचे लोक गंभीर जखमी झाले असून, दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारींवरून वाशी पोलीस ठाण्यात एकूण ९ जणांवर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली तक्रार : शेताच्या बांधावरून कोयता व दगडाने हल्ला
अक्षय श्रीराम कोकणे (वय २९ वर्षे, रा. पारगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शेतीच्या बांधाच्या जुन्या वादातून २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.०० ते ७.३० वाजेच्या सुमारास आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला. आरोपी बिभीषण कोकणे, अविनाश कोकणे, चत्तरसिंग कोकणे, सागर कोकणे, वासुदेव कोकणे आणि पूनम कोकणे (सर्व रा. पारगाव) यांनी अक्षय कोकणे, त्यांचे वडील श्रीराम कोकणे व आई रेखाबाई यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, कोयत्याने आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी अक्षय कोकणे यांच्या वैद्यकीय जबाबावरून वाशी पोलिसांनी वरील ६ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), १८९(२), १९०, १९१(२)(३), ३५२, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दुसरी तक्रार : लग्न मोडल्याच्या संशयावरून लोखंडी वस्तूने मारहाण
तर दुसऱ्या बाजूने अविनाश बिभीषण कोकणे (वय ३१ वर्षे, रा. पारगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजेच्या सुमारास अक्षय याचे लग्न मोडल्याचा संशय मनात धरून आरोपींनी वाद घातला. आरोपी अक्षय श्रीराम कोकणे, रेखा श्रीराम कोकणे, श्रीराम सोनबा कोकणे आणि बालाजी उत्रेश्वर बाराते (सर्व रा. पारगाव) यांनी अविनाश कोकणे, त्यांचे वडील व पत्नी यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लोखंडी वस्तूने व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी अविनाश कोकणे यांच्या वैद्यकीय जबाबावरून वाशी पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.






