उमरगा: शेतातील अरण खोदलेली माती आपल्या शेतात का टाकून घेतली, या कारणावरून झालेल्या वादात एका ६५ वर्षीय वृद्धेला लाथाबुक्क्या, काठी आणि दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना मळगीवाडी (ता. उमरगा) येथे घडली आहे. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निर्मलाबाई आण्णाराव घोंगडे (वय ६५, रा. मळगीवाडी, ता. उमरगा, जि. धाराशिव) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचे नाव असून त्यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. तर आनंद मनोहर मुगळे, आकाश आनंद मुगळे, सरोजा आनंद मुगळे (सर्व रा. मळगीवाडी) आणि गणेश अभिमन्यु गायकवाड (रा. डिग्गी, ता. उमरगा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मळगीवाडी शिवारात २० मे रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. ‘आमच्या शेतातील अरण खोदलेली माती तुमच्या शेतात का टाकून घेतली?’ अशी कुरापत काढून वरील चारही आरोपींनी निर्मलाबाई घोंगडे यांना गाठले. काही समजण्याच्या आतच आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाद वाढल्यानंतर आरोपींनी निर्मलाबाई यांना लाथाबुक्क्यांनी, तसेच हातातील काठी आणि दगडाने बेदम मारहाण केली. या जीवघेण्या हल्ल्यात निर्मलाबाई गंभीर जखमी झाल्या आहेत.
घटनेनंतर निर्मलाबाई घोंगडे यांनी २४ मे रोजी उमरगा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.



