धाराशिव: धाराशिव शहरातील झेंडा चौक, तांबरी विभाग येथील १५ वर्षीय प्रतिक शेषेराव गोरे हा मुलगा दि. २८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. प्रतिकचे वडील शेषेराव गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रतिक हा भोसले हायस्कूल समोरील हॉटेल चहा बॅक येथून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेला आहे.
प्रतिक हा वरुड वाघोली येथील रहिवासी असून सध्या तो धाराशिव येथे राहत होता. २८ जानेवारी रोजी दुपारी तो घराबाहेर पडला होता आणि त्यानंतर तो परतलाच नाही. त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला असता तो कुठेही सापडला नाही. अखेर त्याच्या वडिलांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी शेषेराव गोरे यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून प्रतिकचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. प्रतिकला पळवून नेणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.