धाराशिव: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा कथित सूत्रधार पिटू उर्फ विनोद गंगणे याच्या अटकेनंतर आता आणखी एक स्फोटक खुलासा समोर आला आहे. गंगणेचे दोन्ही मोबाईल फोन, ज्यात अनेक ‘बड्या’ लोकांचे सिक्रेट दडल्याची चर्चा आहे, रहस्यमयरित्या ‘गहाळ’ झाले आहेत. ही माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात देताच, आधीच तापलेल्या कोर्टरूममधील वातावरण आणखीनच गरम झाले. या नव्या ट्विस्टमुळे आता गंगणेसोबतच पडद्यामागे असलेल्या अनेक ‘दादा-भाईं’चे धाबे दणाणले आहेत.
‘मोबाईल गहाळ’ की ‘पुरावे गायब’ करण्याचा खेळ?
शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सरकारी वकील ॲड. महेंद्र देशमुख यांनी एक मोठा बॉम्ब टाकला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, “आरोपी गंगणेने अत्यंत जाणीवपूर्वक आपले दोन्ही मोबाईल गहाळ केले आहेत आणि याची तक्रार २८ मार्च रोजी सोलापूरच्या मोहोळ पोलीस ठाण्यात दिली आहे.” त्यांचा युक्तिवाद स्पष्ट होता – ड्रग्ज प्रकरणात नाव येताच मोबाईल कसे काय गहाळ होतात? हा निव्वळ योगायोग नसून पुरावे नष्ट करण्याचा थंड डोक्याने केलेला प्रयत्न आहे.
ही बाब समोर येताच न्यायाधीश श्रीमती मिटकरी यांनी आरोपीच्या वकिलांना प्रश्नांच्या फेऱ्यात घेरले. या अनपेक्षित खुलाशाने गंगणेच्या वकिलांचीही भंबेरी उडाली.
‘क्रिमिनल माईंड’ आणि मटक्याचे कनेक्शन
सरकारी वकिलांनी गंगणे हा ‘क्रिमिनल माईंड’चा असल्याचा दावा केला. ड्रग्ज प्रकरणासोबतच त्याचे नाव मटका बुकी चालवण्यातही आल्याने त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची खोली अधिकच गडद झाली आहे. त्यामुळे या ‘गहाळ’ झालेल्या मोबाईलमध्ये फक्त ड्रग्ज रॅकेटच नाही, तर मटक्याच्या काळ्या दुनियेतील अनेक रहस्येही दडलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आमदारांचा ‘लाडका’ कार्यकर्ता आणि मोबाईलमधील ‘सिक्रेट डेटा’
विनोद गंगणे हा स्थानिक आमदार राणा पाटील यांचा ‘लाडका’ कार्यकर्ता असल्याची चर्चा संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात सुरू आहे. आता त्याच्या मोबाईलमध्ये ‘बड्या लोकांचा सिक्रेट डेटा’ होता, हे समोर आल्याने या चर्चेला आणखीनच फोडणी मिळाली आहे. ते ‘बडे लोक’ कोण? त्या ‘सिक्रेट डेटामध्ये’ काय दडलंय? आणि त्याचा आमदारांशी काय संबंध? असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. गंगणेच्या अटकेपेक्षाही त्याच्या मोबाईलच्या या ‘गायब’ होण्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
थोडक्यात, पिटू गंगणे गजाआड गेला असला तरी, त्याच्या मोबाईलमधील ‘भूत’ आता अनेकांना सतावणार आहे. पोलीस या मोबाईलचा शोध लावणार का, की हा ‘सिक्रेट डेटा’ कायमचा रहस्य बनून राहणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.