वाशी : तालुक्यातील पारगाव येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करत कपाटातील तब्बल अडीच लाख रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना २६ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी गोपाळ जयप्रकाश देशपांडे (वय ४१, रा. पारगाव, ता. वाशी) यांच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. २६ जून रोजी रात्री १:१० ते २:३५ च्या दरम्यान, अज्ञात व्यक्तीने देशपांडे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
घरात शिरल्यानंतर चोरट्याने लोखंडी कपाटात ठेवलेले ११६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि १० तोळे (भार) चांदीचे दागिने असा एकूण २,५०,००० रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला.
घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर गोपाळ देशपांडे यांनी २७ जून रोजी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३) आणि ३०५(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चिंचपूर खुर्द येथे दिवसाढवळ्या घरफोडी; सव्वा लाखांचा ऐवज लंपास
परंडा : तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथे एका बंद घराचा कडी-कोंडा काढून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख २७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी ज्ञानेश्वर बिभीषण लांडे (वय २८, रा. चिंचपूर खुर्द) यांनी आंबी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लांडे यांचे घर २६ जून रोजी सकाळी ९ वाजेपासून ते २७ जून रोजी पहाटे २ वाजेपर्यंत बंद होते. याच कालावधीत अज्ञात चोरट्याने संधी साधून घराचा कडी-कोंडा काढून आत प्रवेश केला.
चोरट्याने घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ७५,००० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १,२७,४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
ज्ञानेश्वर लांडे यांनी २७ जून रोजी दिलेल्या तक्रारीवरून आंबी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) आणि ३०५(३)(५) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.