येरमाळा: येथील प्रसिद्ध येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या पुणे जिल्ह्यातील एका ६३ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने हिसकावून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रविवार, दि. २० जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास मंदिराच्या बाहेरील डोंगराळ परिसरात घडली. याप्रकरणी येरमाळा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रंजना पोपट जाधव (वय ६३, रा. बोरी बुद्रुक, ता. जुन्नर, जि. पुणे) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. रंजना जाधव या आपल्या बहिणीसोबत येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्या मंदिरासमोरील पश्चिम बाजूच्या डोंगराळ भागातील घनदाट जंगलात नैसर्गिक विधीसाठी गेल्या होत्या.
याचवेळी संधी साधून एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील ५० ग्रॅम वजनाचे, अंदाजे २,००,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने तोडून घेतले आणि तेथून पळ काढला. या अनपेक्षित घटनेमुळे रंजना जाधव प्रचंड घाबरल्या.
त्यानंतर त्यांनी तातडीने येरमाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ (२) अन्वये गुन्हा नोंदवला असून, आरोपीचा शोध सुरू केला आहे. ऐन गर्दीच्या वेळी आणि तीर्थक्षेत्राच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.