धाराशिव: “प्रशासनाकडून अपेक्षा तरी कोणाकडे करायची, जेव्हा रक्षकच भक्षकांची ढाल बनतात?” असा संतप्त सवाल धाराशिव जिल्ह्यातील चोरखळी परिसरातील नागरिक विचारत आहेत. निमित्त आहे महाकाली कला केंद्राच्या गैरप्रकारांकडे येरमाळा पोलिसांनी केलेले अक्षम्य दुर्लक्ष. गुरुवारी रात्री एका जागरूक नागरिकाने पोलीस हेल्पलाईन (११२) वर संपर्क साधूनही पोलिसांनी वादग्रस्त कला केंद्रावर कारवाई न करताच माघारी फिरल्याने, पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘ते’ आले, पाहिले आणि निघून गेले!
चोरखळी येथील महाकाली कला केंद्र हे सतत कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. वेळेचे नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत डीजेच्या तालावर चालणारा धांगडधिंगा हा नित्याचाच झाला आहे. गुरुवारी रात्री पुन्हा एकदा हाच प्रकार सुरू असताना एका नागरिकाने थेट पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर फोन करून तक्रार नोंदवली.
या तक्रारीनंतर येरमाळा पोलीस स्टेशनची गाडी (डायल ११२) तातडीने घटनास्थळी दाखल झाली. गाडीमध्ये पोलीस कर्मचारी पालके व त्यांचे सहकारी उपस्थित होते. मात्र, पुढे जे घडले ते धक्कादायक होते. नियमांचे उल्लंघन उघड्या डोळ्यांना दिसत असतानाही, या पोलीस पथकाने कला केंद्रावर कोणतीही कारवाई केली नाही. केवळ एक औपचारिक फेरी मारून हे पथक आल्यापावली परत गेले. “पोलिसांचे आणि केंद्र चालकांचे ‘अर्थपूर्ण’ संबंध आहेत, त्यामुळेच तक्रार करूनही काहीच होत नाही,” असा थेट आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत.
खुनाच्या आरोपांनंतरही अभय का?
हे प्रकरण केवळ वेळेच्या उल्लंघनापुरते मर्यादित नाही. याच कला केंद्रातील काही कलावंतीणींवर उमरगा येथील एका तरुणाच्या खुनाचा गंभीर आरोप आहे, ज्यात त्यांना अटकही झाली आहे. अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि सतत नियम मोडणाऱ्या केंद्रावर कारवाई करण्यास पोलीस का कचरत आहेत? कोणाच्या राजकीय किंवा आर्थिक दबावाखाली येरमाळा पोलीस या गैरप्रकारांकडे कानाडोळा करत आहेत? असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत.
एका बाजूला घुंगरांचा आवाज आणि डीजेचा दणदणाट, तर दुसऱ्या बाजूला गुन्हेगारी आणि रक्ताचा सडा… धाराशिव जिल्ह्यातील चोरखळी येथील महाकाली कला केंद्राचे हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कलेच्या नावाखाली चालणाऱ्या या तमाशा फडावर गंभीर आरोप होत असून, स्थानिक येरमाळा पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करावी आणि वादग्रस्त कला केंद्राच्या मुसक्या आवळाव्यात, अशी जोरदार मागणी जोर धरत आहे. अन्यथा, कलेचा बुरखा पांघरून फोफावणारा हा गुन्हेगारीचा अड्डा पोलिसांच्याच आशीर्वादाने अधिक बेलगाम होईल, ही भीती अनाठायी नाही.
Video