धाराशिव: जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. एकूण ५५ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत. बुधवार ( २१ जानेवारी ) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, त्यापूर्वीच जिल्ह्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.
दोन्ही राष्ट्रवादी येणार एकत्र?
राज्यात सत्तेत असलेली महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी या दोन्ही समीकरणांना धाराशिवमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर ‘आघाडीत बिघाडी आणि महायुती तुटणार’ असे चित्र निर्माण झाले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट या निवडणुकीत एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीमधील अजित पवार गट शरद पवार गटासोबत गेल्याने भाजपची कोंडी झाली आहे.
भाजपची ‘एकला चलो रे’ ची भूमिका
राष्ट्रवादीच्या या स्थानिक समझोत्यामुळे भाजपने या निवडणुकीत स्वतंत्र लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि रासप (राष्ट्रीय समाज पक्ष) हे चार पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचे समजते.
शिंदे गटात दोन तट, कार्यकर्ते सैरभैर
शिवसेना (शिंदे गट) मध्ये मात्र अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षात उघडपणे दोन गट पडल्याचे चित्र आहे:
-
पालकमंत्री प्रताप सरनाईक गट: सरनाईक यांची भूमिका भाजपसोबत युती करून लढण्याची आहे.
-
माजी मंत्री तानाजी सावंत गट: सावंत यांचे भूम, परंडा आणि वाशी या तालुक्यांमध्ये निर्विवाद वर्चस्व आहे. त्यांची भूमिका मात्र स्वतंत्र निवडणूक लढवून आपली वेगळी चूल मांडण्याची आहे.
नेत्यांच्या या परस्परविरोधी भूमिकांमुळे शिंदे गटातील कार्यकर्ते आणि उमेदवार मात्र सैरभैर झाले आहेत. अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, धाराशिवच्या राजकारणात नक्की कोण कोणासोबत जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.






