भूम: सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भूम तालुक्यातील बेदरवाडी येथे घडली आहे. ही घटना १९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी मयत विवाहितेच्या पतीसह सासू, सासरे आणि नणंदेविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पायल शुभम वनवे असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पूजा शेषराव जाधवर (वय ३२, रा. बेदरवाडी, ता. भूम) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत आरोपी पती शुभम सुरेश वनवे, सासरे सुरेश दादासाहेब वनवे, सासू शारदा सुरेश वनवे (सर्व रा. बेदरवाडी) आणि नणंद सुष्मा खाडे (रा. कुरकुंब, ता. पंढरपूर) यांनी संगनमत करून पायलचा छळ केला. पतीने तिला उसाने मारहाण केली, तर इतर सासरच्या मंडळींनी तिला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला.
या सततच्या जाचाला आणि मारहाणीला कंटाळून पायल यांनी १९ जानेवारी रोजी दुपारी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
फिर्यादीवरून भूम पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०७ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ३५१ (३) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) कलम ४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भूम पोलीस करत आहेत.






