वाशी: जुन्या वादातून आणि दारूच्या नशेत बेकायदेशीर जमाव जमवून एका वृद्ध दाम्पत्यासह अन्य एकाला जबर मारहाण करत त्यांचे घर पाडून ५ लाखांचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील शेलगाव येथे घडली आहे. ही घटना १ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली होती, मात्र याबाबत १९ जानेवारी २०२६ रोजी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयमाला गौतम भैरट (वय ६०, रा. शेलगाव, ता. वाशी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शेलगाव येथे हा प्रकार घडला. फिर्यादी जयमाला, त्यांचे पती गौतम भैरट आणि लक्ष्मण माती भैरट हे घरी असताना आरोपी सतीश सब्राव भैरट, सुदर्शन राजेंद्र भैरट, विश्वनाथ ज्ञानोबा भैरट, अंगद विश्वनाथ भैरट, विजय उत्तम भैरट, तात्या गणपत सातपुते आणि सागर ज्ञानोबा आव्हाड (सर्व रा. शेलगाव) हे सर्वजण दारू पिऊन आले.
आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या पतीला तसेच लक्ष्मण भैरट यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. इतकेच नव्हे तर, आरोपींनी फिर्यादी व लक्ष्मण भैरट यांचे राहते घर पाडून सुमारे ५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केले.
याप्रकरणी जयमाला भैरट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात वरील सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२४ (५), ३३३ (घरफोडी/नुकसान), १८९ (२), १९१ (२) (बेकायदेशीर जमाव), १९०, ११५ (२), ३५२ आणि ३५१ (२) (३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वाशी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







