नळदुर्ग: तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथे चक्क ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरातच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांवर नळदुर्ग पोलिसांनी कारवाई केली आहे. १९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी केलेल्या या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होर्टी गावात ग्रामपंचायत कार्यालयाजवळ काही व्यक्ती प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी १९ जानेवारी रोजी दुपारी २:२० आणि ३:०० वाजता छापे टाकले.
या कारवाईत सोमनाथ बसवंत भुजबळ (वय ४२, रा. होर्टी) याला दुपारी २:२० वाजण्याच्या सुमारास ५१३ रुपये किमतीचा मुद्देमाल बाळगताना पकडण्यात आले. तर रामेश्वर बाबुराव भुजबळ (वय ४२, रा. होर्टी) याला दुपारी ३:०० वाजता ५०८ रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.
दोघांकडूनही शासनाने प्रतिबंधित केलेला केसरयुक्त विमल पान मसाला, व्ही-१ तंबाखू, गायछाप पुड्या, किसन तंबाखू तोटे आणि ब्रिस्टॉल सिगारेट असा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींविरुद्ध सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा (COPTA Act) कलम ६ (ब) आणि २४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आरळी खुर्दमध्ये गुटखा विक्रीचा पर्दाफाश; नळदुर्ग पोलिसांच्या छाप्यात १२ हजारांचा मुद्देमाल जप्त
नळदुर्ग : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूची अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने साठा बाळगणाऱ्या एका व्यक्तीवर नळदुर्ग पोलिसांनी कारवाई केली आहे. तुळजापूर तालुक्यातील आरळी खुर्द येथे टाकलेल्या या छाप्यात सुमारे १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश देवबा गायकवाड (रा. आरळी खुर्द, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आरळी खुर्द येथे प्रकाश गायकवाड हा प्रतिबंधित गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नळदुर्ग पोलिसांच्या पथकाने तत्काळ सापळा रचून कारवाई केली. यावेळी आरोपीकडे विक्रीसाठी बाळगलेला ‘डायरेक्टर पान मसाला’, ‘शॉट तंबाखू’, ‘केसरयुक्त विमल पान मसाला’ आणि ‘व्ही-१ तंबाखू’ असा एकूण १२,०३० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला.
पोलिसांनी हा सर्व साठा जप्त केला आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात आरोपी प्रकाश गायकवाड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ (आदेशाचे उल्लंघन), २७४ (भेसळ), २७५ आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम ५९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.







