वाशी: जनावरांच्या चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता त्यांना कोंबून कत्तलीसाठी घेऊन जाणारा आयशर टेम्पो वाशी पोलिसांनी पारगाव टोल नाका येथे पकडला आहे. या कारवाईत ११ जर्सी गाईंसह १३ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून, बीडच्या एका चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई १८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी पावणेपाचच्या (१६:५०) सुमारास पारगाव टोल नाका येथे करण्यात आली. एमएच २३ डब्ल्यू ११३७ (MH 23 W 1137) या आयशर टेम्पोमधून जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी टेम्पो अडवून पाहणी केली असता, त्यात ११ जर्सी गाई, एक बैल आणि एक वासरू अशी एकूण ३ लाख ७० हजार रुपये किमतीची जनावरे आढळून आली. ही सर्व जनावरे टेम्पोमध्ये अत्यंत दाटीवाटीने आणि निर्दयतेने बांधलेली होती. आरोपीने त्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था केली नव्हती आणि त्यांना कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी पोलिसांनी शेख अमीर शेख खैरुद्दीन (रा. नेकनूर, जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाशी पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१) च्या विविध उपकलमांसह आणि प्राण्यांचे परिवहन अधिनियम कलम ४७, ५४, ५६ अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.






