धाराशिव: राजकारणात जे दिसतं ते नसतं आणि जे असतं ते कधीच सरळ सांगायचं नसतं! धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यात सध्या असाच काहीसा ‘पटकथा’ लिहिलेला ड्रामा रंगल्याची जोरदार चर्चा आहे. लोकसभेच्या दणदणीत पराभवानंतर पुन्हा जिल्हा परिषदेसाठी सज्ज झालेल्या भाजप आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी अचानक माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. पण थांबा! ही साधीसुधी माघार नसून, हा एक ‘प्रिपेड इमोशनल ड्रामा’ असल्याची खुमासदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
🎬 ‘फ्लॉप’ शो नंतर पुन्हा एन्ट्री?
लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा तीन लाखांच्या फरकाने पराभव पचवल्यानंतरही, जिल्हा परिषदेचे ‘अध्यक्षपद’ (जे महिला ओपनसाठी राखीव आहे) खुणावत असल्याने अर्चना पाटील यांनी ‘तेर’ आणि ‘केशेगाव’ अशा दोन-दोन गटांतून उमेदवारी अर्ज भरला. एका जागेवर भरवसा नसल्याने दोन जागा अडवल्याची टीका झाली, पण आता अचानक पुत्र मल्हार पाटील यांनी आईच्या माघारीची बातमी पत्रकारांना दिली.
🔥 सक्षणा सलगर यांची तोफ आणि ‘घराणेशाही’चा मुद्दा
एकीकडे अर्चना पाटील यांच्या माघारीची चर्चा, तर दुसरीकडे ‘तेर’ गटातून समोर ठाकलेल्या सक्षणा सलगर यांनी डागलेली तोफ! सलगर यांनी अर्चना पाटलांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
“स्वतःच्या विजयाचा आत्मविश्वास नाही म्हणून दोन-दोन जागा अडवायच्या? पक्ष काय तुमच्या खिशात आहे का? आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय फक्त आयुष्यभर तुमच्या सतरंज्याच उचलायच्या?”
असा तिखट सवाल करत सलगर यांनी लढतीला ‘सर्वसामान्य वि. प्रस्थापित’ असे रूप दिले आहे. “मी सामान्य घरातील मुलगी आहे, समोरची उमेदवार धनशक्तीवाली आहे. पण जनता आता यांना धूळ चारणार,” असा एल्गारच त्यांनी पुकारला आहे. इतकेच नव्हे तर, “हिंमत असेल तर अध्यक्षपदाचा मोह सोडा आणि सामान्य महिलेला संधी द्या,” असे खुले आव्हानही त्यांनी दिले.
🎭 हा तर ‘इमोशनल ड्रामा’! (Inside Story)
सक्षणा सलगर यांचा हा आक्रमक पवित्रा आणि मतदारसंघातील कठीण समीकरणे पाहता, पाटील गटाने ‘माघारी’चे अस्त्र बाहेर काढले आहे. पण जाणकारांच्या मते, हा ‘सहानुभूती’ गोळा करण्याचा भाग असू शकतो.
आता पुढे काय होणार? (संभाव्य स्क्रिप्ट):
-
बातमी पसरली की अर्चना ताई लढणार नाहीत.
-
मग ‘ठरल्याप्रमाणे’ निष्ठावंत कार्यकर्ते जमा होणार.
-
राडा-रडी होणार, “ताई, तुम्ही माघार घेतली तर आम्ही जगून काय फायदा?” असा इमोशनल सीन क्रिएट केला जाणार.
-
“तुमच्याशिवाय पर्याय नाही,” अशी आर्त साद घातली जाणार.
-
आणि मग… “कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर आणि आग्रहास्तव” ताई पुन्हा रिंगणात उतरणार!
थोडक्यात काय, तर वातावरण निर्मितीसाठी पेरलेली ही बातमी आहे, असे बोलले जात आहे. त्यामुळे जोपर्यंत अर्चना पाटील अधिकृतरीत्या माघारीचा फॉर्म निवडणूक अधिकाऱ्याकडे जमा करत नाहीत, तोपर्यंत हा ‘इमोशनल ड्रामा’ की ‘खरा राजकीय संन्यास’, हे सांगणे कठीण आहे. पिक्चर अभी बाकी है!





