धाराशिव: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत धाराशिवमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. निष्ठावंत शिवसैनिकांचा संताप आणि वाढता दबाव पाहून अखेर भाजप नेते राणा जगजीतसिंह पाटील यांना नमते घ्यावे लागले आहे. या दबावामुळेच पळसप जिल्हा परिषद गटातून भाजपमधून आयात केलेले उमेदवार माजी जि. प. अध्यक्ष नेताजी पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून, आता शिंदे गटाचे निष्ठावंत अजित लाकाळ हेच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असणार आहेत.
-
निष्ठावंतांचा विजय, आयारामांची माघार: पळसप गटात शिवसेनेची (शिंदे गट) ताकद असतानाही ही जागा भाजपच्या नेत्याला (नेताजी पाटील) देण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र, स्थानिक शिवसैनिकांनी याला तीव्र विरोध दर्शवला. हा विरोध इतका प्रखर होता की, अखेर महायुतीला आपला निर्णय बदलावा लागला.
-
राणा पाटलांची कोंडी: “एकीकडे स्वतःच्या पत्नीसाठी (अर्चना पाटील) आपल्याच कार्यकर्त्याचा बळी द्यायचा आणि दुसरीकडे शिवसेनेच्या हक्काच्या जागेवर भाजपचा कार्यकर्ता उभा करायचा,” या राणा पाटलांच्या रणनीतीवर शिवसैनिकांनी सडकून टीका केली. या दुहेरी भूमिकेमुळे निर्माण झालेला असंतोष शमवण्यासाठी अखेर राणा पाटलांना माघार घ्यावी लागली.
-
अजित लाकाळ यांच्यावर शिक्कामोर्तब: सुरुवातीला पक्षाने अजित लाकाळ यांना केवळ ‘बी’ फॉर्म देऊन संभ्रमात ठेवले होते आणि भाजपच्या नेताजी पाटलांना ‘ए’ फॉर्म दिला होता. मात्र, आता चित्र स्पष्ट झाले आहे. लाकाळ यांच्या बंडखोरीच्या इशाऱ्यानंतर आणि शिवसैनिकांच्या एकजुटीमुळे पक्षाने अजित लाकाळ यांनाच अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
काय घडले पडद्यामागे?
महायुतीमध्ये जागा वाटपावरून झालेला गोंधळ आणि निष्ठावंतांना डावलून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली उमेदवारी, यामुळे धाराशिवमधील वातावरण तापले होते. विशेषतः पळसप गटात, जिथे नेताजी पाटील यांचे मतदानही नव्हते, तिथे त्यांना उमेदवारी लादली गेली होती. “उपऱ्या उमेदवाराला संधी का?” असा सवाल करत तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांच्या या भूमिकेला तळागाळातील शिवसैनिकांनी साथ दिल्याने अखेर नेताजी पाटलांना माघार घ्यावी लागली आणि अजित लाकाळ यांचा मार्ग मोकळा झाला.
आता पळसप गटात अजित लाकाळ हे शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार म्हणून ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर लढतील. या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, बंडाचे ढग विरघळले आहेत. मात्र, या घडामोडींमुळे राणा पाटलांच्या राजकीय वर्चस्वाला एक धक्का मानला जात आहे.






