उमरगा : सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. १०) दुपारी उमरगा शहराजवळील चौरस्ता परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील एक कुटुंब तुळजापूर तालुक्यातील श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन आपल्या गावी परत जात होते. उमरगा चौरस्त्याजवळील भारत टायर दुकानासमोर कार (क्रमांक टीएस 34 एफ 4706) भरधाव वेगाने जात असताना अचानक टायर फुटले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या स्टॉलवर जाऊन आदळली.
या अपघातात चहाच्या स्टॉलवर बसलेल्या उमरगा येथील माजी नगरसेवक बळी पवार आणि जनता अर्थमुव्हर्सचे मालक लाडनशहा मुर्शद यांचा जागीच मृत्यू झाला. तर मेकॅनिक सचिन कुठार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
या भीषण अपघातामुळे उमरगा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.






