कळंब : पुतळा आणि जयंतीसाठी वर्गणी (पट्टी) न दिल्याच्या कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करत लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना मोहा (ता. कळंब) येथे घडली. या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल मुकुंद कसबे (वय ३९, रा. मोहा, ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (ता. २०) दुपारी दोन वाजेच्या सुमारास अमोल कसबे हे मोहा येथील समाज मंदिरासमोर आले होते. यावेळी आरोपी बाबासाहेब सोमनाथ कसबे, राहुल सोमनाथ कसबे, नाना सोमनाथ कसबे, प्रियांका बाबासाहेब कसबे आणि शितल राहुल कसबे (सर्व रा. मोहा) यांनी तिथे गैरकायद्याची मंडळी जमवली.
“तू पुतळ्यासाठी व जयंतीसाठी पट्टी (वर्गणी) दिली नाहीस, त्यामुळे तुझा येथे यायचा काय संबंध?” असे म्हणत या सर्वांनी अमोल यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले. तसेच, “परत येथे आलास तर जिवे ठार मारू,” अशी धमकीही त्यांनी दिली.
या घटनेनंतर अमोल कसबे यांनी कळंब पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून बाबासाहेब कसबे, राहुल कसबे, नाना कसबे, प्रियांका कसबे आणि शितल कसबे या पाचही जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, १८९(२), १९१(२), १९१(३), १९० आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलिस करत आहेत.






